आजरा :
येथील व्यंकटराव शिक्षण संकुलात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजरा महाल शिक्षण मंडळाचे चेअरमन श्री. जयवंतरावजी शिंपी यांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री. जयवंतराव शिंपी म्हणाले की, "तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या आजच्या जगाला खऱ्या अर्थाने गांधी विचारांची गरज आहे. गांधीजींच्या अहिंसा तत्त्वाचा स्वीकार संपूर्ण जगाने करणे ही आपल्या भारताची फार मोठी पोचपावती आहे." तसेच 'जय जवान, जय किसान'चा नारा देणारे लालबहादूर शास्त्री यांचे देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असल्याचे मतही त्यांनी मांडले.
पंचायत समिती शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार कार्यक्रमात इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी 'नशामुक्ती' या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर करून उपस्थितांचे प्रबोधन केले. या पथनाट्यासाठी श्री. एस. एस. कालेकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व्यंकटराव महाविद्यालय, व्यंकटराव हायस्कूलच्या इयत्ता नववी 'ड' चे विद्यार्थी आणि मार्गदर्शिका सौ. ए. एस. गुरव यांच्या वतीने करण्यात आले होते.
या कार्यक्रमास आजरा महाल शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष के. जी. पटेकर, खजिनदार सुनील पाटील, संचालक सुधीर जाधव, सचिन (भैय्या) शिंपी, अशोक पोवार, प्रभारी प्राचार्य चंद्रकांत पन्हाळकर, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य संजयकुमार पाटील, पर्यवेक्षिका व्ही. जे. शेलार, ज्येष्ठ शिक्षिका श्रीम. एन. ए. मोरे, सौ. एस. डी. इलगे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. पी. होरटे यांनी केले