सारथी महाराष्ट्राचा ई-पेपर
महाराष्ट्र

बापूसाहेब सरदेसाई हायस्कूलमध्ये 'हादगा बोळवण' उत्साहात; रानफुले-भाज्यांच्या आराशीतून जपली लोकसंस्कृती

Admin Sarthi Maharashtracha • 10 October 2026, 03:56 PM

गवसे (प्रतिनिधी): गोपाळ गडकरी,

महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा आणि कृषी संस्कृतीचा अनमोल वारसा जपत, येथील बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूलमध्ये 'हादगा बोळवण' कार्यक्रम अत्यंत उत्साही, मांगल्याच्या व चैतन्यमय वातावरणात दिमाखात पार पडला.

​कार्यक्रमाचा प्रारंभ श्री. चंद्रकांत घुणे सर यांच्या हस्ते विधिवत हादगापूजनाने झाला. यावेळी निसर्गातील विविध रानफुले आणि ताज्या भाज्यांची आकर्षक सजावट करून हत्तीभोवती निसर्गरम्य आरास साकारण्यात आली होती. रानफुले व भाज्यांचा वैशिष्ट्यपूर्ण हार अर्पण करत श्री. घुणे सरांनी शेतकऱ्यांचे निसर्गाशी असलेले अतूट नाते उलगडून दाखवले.

​"शेतकऱ्यांच्या जीवनात सुख-समृद्धीची भरभराट व्हावी, हत्तीच्या सोंडेसारखा दमदार पाऊस पडून धरणीमाता सुपीक व्हावी आणि शेतामध्ये हत्तीसारखे विपुल धान्य पिकावे," अशी प्रार्थना यावेळी निसर्गाकडे करण्यात आली. पुराणात व चित्रात ज्याप्रमाणे हत्ती आणि लक्ष्मीचे अढळ स्थान एकत्र दिसते, त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या घरात लक्ष्मी सदैव नांदावी आणि बळीराजाचे घर-अंगण धनधान्याने भरून जावे, अशी कृतज्ञ भावना व्यक्त झाली.

​पूजनानंतर शाळेच्या प्रांगणात पारंपरिक हादग्याची लोकगीते घुमली. विद्यार्थिनींनी तालासुरात गाणी गात फेर धरला, ज्यामुळे परिसर पारंपरिक उत्साहाने न्हाऊन निघाला. गाण्यांनंतर मुलींमध्ये रंगलेली 'खिरापत' ओळखण्याची चुरस विशेष आकर्षण ठरली. खिरापत ओळखल्यानंतर सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

​या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थिनींना सौ. सुमित्रा ढेकळे, श्री. अशोक महाजन सर, श्री. रवि भालेकर सर, श्री. संदीप वाटवे आणि सौ. अंजना कांबळे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी श्री. प्रकाश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

​शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा लोकोत्सव अविस्मरणीय व देखणा ठरला.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)