सारथी महाराष्ट्राचा ई-पेपर
महाराष्ट्र

आजरा हायस्कूलमध्ये गांधी-शास्त्री जयंती उत्साहात; स्वच्छता अभियानातून दिला स्वच्छतेचा संदेश

Admin Sarthi Maharashtracha • 02 October 2026, 08:37 AM

आजरा (प्रतिनिधी) : गोपाळ गडकरी,

येथील आजरा हायस्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि आदरपूर्वक साजरी करण्यात आली. अण्णाभाऊ स्मृती पंधरवडा व महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून प्रशालेच्या वतीने आजरा शहरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

​कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक श्री. ए. आर. व्हसकोटी आणि उपस्थित शिक्षकांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महात्मा गांधीजींची सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेची शिकवण तसेच शास्त्रीजींचा साधेपणा, निस्वार्थ देशभक्ती व कर्तव्यनिष्ठा या मूल्यांची माहिती देण्यात आली.

​यावेळी शिक्षिका भाग्यश्री पाटील यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनप्रवासावर व विचारांवर सविस्तर प्रकाश टाकला, तर संजीवनी कुराडे यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या देशसेवेतील योगदानावर विचार मांडले. संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार माधवी शेलार यांनी मानले.

​जयंतीच्या निमित्ताने आयोजित स्वच्छता अभियानात प्रशालेतील विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी आजरा परिसरातील प्रमुख ठिकाणांची सफाई करून स्वच्छतेचा संदेश दिला. "स्वच्छता ही केवळ एका दिवसापुरती किंवा अभियानापुरती मर्यादित न राहता ती प्रत्येकाच्या दैनंदिन आचरणाचा भाग बनली पाहिजे," अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या या सक्रिय पुढाकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत प्रभावी जनजागृती निर्माण झाली.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)